मी नभात घेते झोके
मी अशीच आहे वेडी
मी जपते तरीही आहे
या पायामधली बेडी
मी स्वप्न पाहते आहे
सत्यात कधी न् येणारे
मी तरीही मोजत बसते
या नभांगणातील तारे
मी नाही नाही म्हणते
उच्चार होय का होतो
होकार देत असताना
तुज नकार ऐकू येतो
मी काय करावे याला
मजपाशी उत्तर नाही
हे अनाम नाते म्हणजे
उडणारे अत्तर नाही
मज कळतच नाही आता
हे काय खरे अन् खोटे
मी लिहीतच नाही हल्ली
वहीवरी फायदे तोटे
वेगळी दिशाही आहे
वाईट जराही नाही
मन नितळ निरागस असता
घडणार न भलते काही
भेटलो एकदा आणि
उसळला समिंदर पुन्हा
यामध्ये सांग कुणाचा
हा खरेच आहे गुन्हा!!
-मधुसूदन नानिवडेकर
Tags:
Stories/Poems