कावेरी



कावेरी

( वाचकांसाठी सुचना:- या कथेचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही, आल्यास तो केवळ योगायोग समजावा)


      दिवस मावळला होता, थोडा थोडा अंधार पडला होता, कावेरी आताच धान्य मागून आली, पण तिचा मुलगा शाम्या कुठेच दिसत नव्हता. शाम्या तसा आता १४-१५ वर्षाचा झाला होता त्यामुळे त्याची आता काळजी नव्हती पण गावातल्या काही टुकार पोरांच्या सोबत राहिला उनाडक्या करू लागला.
      

  तसं पाहिलं तर कावेरीचं मुळ गाव हे नव्हतं, ती १७ ते १८ वर्षापूर्वी एकटीच बाभूळवाडीला आली होती, ती कुठून आली हे फार थोडक्याच लोकांना माहीत असावं.


       ती बाभूळवाडीला आली, रहायला घर नव्हतं, पण गावातल्या लोकांनी रहायला जागा दिली आणि तिथे ती झोपडी बांधून राहू लागली. शिवारात जिथे पिकांची काढणी चालू असेल तिथे जावून त्या शेतकऱ्याना कामात थोडी मदत करायची आणि त्या बदल्यात शेतकरी तिला थोड धान्य द्यायचे, त्यालाच गावच्या भाषेत खळं असं म्हणायचे.


       कावेरीला दारू प्यायचीही सवय होती. तिला खळे मागून बरंच धान्य मिळायचं, तेच धान्य ती वर्षभरासाठी साठवून ठेवायची, रोज संध्याकाळी थोडसं धान्य विकून दारू प्यायची आणि झोपायची.


      तिच्या असल्या सवयीमुळे तिला पुरूषांचीच संगत लागली, नंतर नंतर रोज तिच्या झोपडीत पिणारे एक दोन तरी पुरूष दिसायचे. त्यातच तिचे पुरूषांशी संबंध सुरू झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा 'शाम्या' होता.


       पहिलीवेळ आमच्या गावात बिनबापाचा पोर जन्माला आला आणि तो म्हणजे हा शाम्या. तो शाळेत जाण्यायोग्य झाल्यावर कावेरीने कोण्यातरी एका पुरूषाचं नाव लावून शाळेत दाखल केलं आणि पहाता पहाता शाम्या १४-१५ वर्षाचा झाला. तसा तो कावेरीचा फार लाडका पण आता ह्या वयात तोही प्यायला लागला.


         शाम्या आला, त्याला पहाताच दारात दगडावर बसलेली कावेरी बोलली,


"कुटं बसत असतुरं, म्या कवापसून आले, कुठमुन पायचं तुलं? आ??"


शाम्या आपल्या त्याच्या ओरडक्या आवाजातच बोलला,


  "कुटं जावू, इतच हुतोनं बाल्याच्या ईतं, धर चाबी, उगच वरडती"


कावेरीने चावी घेतली, आजही तिने दारू पिली होती त्यामुळे दरवाजा ऊघडता ऊघडता तिची बडबड चालूच होती.
  

"आयकायच नाव नाही पोराचं, नुस्तं टुकार पोरासंगं हिंडतय, कामाचं नाव घेत नाही, मह्यासंगं खळं मागायलं चल मनते तर लाज वाटती याला"


शाम्या - "आजपण ढोसली वाटतं मतारीनं"

कावेरी - "तुह्या बापाची पेतेका बाराच्या"

शाम्या - "थोबाड बंद कर मायलं तुह्या"


     शाम्याचा पारा चढला. शाम्या होता चौदा पंधराच वर्षाचा पण मोठ्या मानसासारखा कावेरीशी भांडायचा. त्यांचे हे भांडणं रोजचेच होती त्यामुळे लोकं कोणी मध्ये बोलायचे नाही याउलट मजा घेत बसत.


       कावेरीने कसे कसे दिवस काढत ईथे राहिली, एकटी बाई असून खंबीरपणे राहिली.  किती आणि कशा कशा लोकांचा सामना करून जगली, कित्येक लोकांनी बळजबरी करून आपली कामवासना तिच्यावर भागवली, कित्येक लोकांनी तिच्या दारूच्या नशेत नको ते केलं ते तिलाही कळलं नाही तरीपण कुठेच गेली नाही, राहिली खंबीरपणे होती तिथेच.


       असल्या प्रकारच्या तक्रारीतरी कुठे कराव्यात आणि तक्रारी करुन कुठे जाणार त्यामुळे तिने काहीच केलं नाही, कालांतराने ह्याच गोष्टींची तिलाही सवय झाली आणि शाम्या मोठा झाल्यावर त्याला जसं समजायला लागलं तसं लोकांना घरी येऊदेणं त्याने बंद केलं.


        लोकांच्या ह्याच संबधामुळे पुढे शाम्याचा जन्म झाला. तिच्यावर झालेल्या प्रसंगाबद्दल ती दु:खी होती का सुखी हे माहीत नाही पण शाम्याच्या जन्मानंतर ती फार आनंदी होती. कदाचित तिला एकटं मरणाची भिती असावी त्यामुळे शाम्याच्या जन्मानंतर तिला जगायला आधार मिळाला, जगायला कारण मिळालं. तो बिनबापाचा का असेना पण होतातर तिच्याच पोटचा गोळा.


        तिच्या ह्या दिवसाची शाम्याला जाणीव नव्हती त्यामुळे तो कावेरीला सतत घालून पाडून बोलायचा आणि कावेरीही काही कमी नव्हती, तिही त्याला तोडीसतोड होती, म्हणूनच मागेपुढे कोणी नसतांना बाभूळवाडीत एकटी रहात होती. पण शाम्यावर जिवापाड प्रेम होतं. राञभर गोंधळ घातला तरी बायकांजवळ बोलतांना 'मव्हा शाम्या आसा, मव्हा शाम्या तसा' ती बोलायची.


         सकाळी कावेरी उठली, शाम्याही उठला. राञीच्या दारूमुळे कावेरीचं अंग दुखत असावं, त्यामुळे भाकरी थापत थापत शाम्याला बोलू लागली,


  "शामा तू शेळ्या सोडनं आज, मव्ह लय आंग दुखतयरं लेकरा"


शाम्या- "राती कमी ढोसायची व्हतीनं, मनं आंग दुखतय, मी नाय जात त्या शेपुर्डयाकड"


कावेरी- "जायनं मायं, म्या यखादं ईंजिकसेन घेऊन येते 
तिसराप-हलोक"


शाम्या- "मलं नाय जावूवाटत त्या शेपटाडाकड"


आता कावेरीला शाम्याचा थोडा रागच आला, आणि रागा रागातच बोलली,
  "मग लोकाचे ढुंगणं धुआयला जातू का मायघाल्या, तुल कुटं शेमुनध-याची नवकरी लागणार हाय काय माईत"
शाम्या- "म्या चल्लो पुन्यालं कंपनीत परस्यासंग"
असं म्हणून शाम्या उठून गेला, कावेरीने भाकरी थापून कशाबशा शेळ्या रानात नेल्या. शाम्या सकाळी बोलला त्याप्रमाणे दुपारी पुण्याला निघून गेला परंतु कावेरीला काहीच माहीत नव्हतं, तिला सकाळी वाटलं होतं कि हा उगच काहीतरी बोलत असेल किंवा जायचं असेल तरी जाईल कधीतरी पण हा असा लगेच जाईल याची तिला कल्पनाच नाही.


       संध्याकाळी घरी आली, बाजूच्या मुलांनी चावी आणून दिली व शाम्या पुण्याला गेला असं सांगितलं. ते ऐकल्याबरोबर कावेरीच्या डोळ्यात अश्रू आले, दरवाजा ऊघडस्तोवर डोळ्यांतले थेंब जमिनीत मुरले होते. घरात बसून आपली एकटीच रडत बसली. आणि रडणार का नाही, कशा आणि कोणत्या परिस्थितीत शाम्याला तिने वाढवलं हे तिलाच माहीत होतं. शाम्या खरोखर तिच्या काळजाचा तुकडा होता, ती स्वतःपेक्षा जास्त प्रेम शाम्यावर करायची आणि शाम्याने असं काहीही न बोलता निघून जाणं तिच्या जिव्हारी लागलं. राञी रडून रडून दुपारची शिळी भाकरी खाऊन झोपली, पण बिचारीला राञभर झोप लागली नाही. मागचे दिवस आठवू आठवू रडत राहिली.


      आज शाम्याला पुण्याला जावून १०-१२ वर्ष झाली, मध्ये मध्ये शाम्या कावेरीला पैसे पाठवायचा त्यामुळे कावेरीचं छान चालू होतं, कधी कधी फोन करायचा त्यामुळे तिला आधार वाटायचा. तरीही तो एवढ्या वर्षात फक्त चार ते पाच वेळा येऊन कावेरीला भेटून गेला होता, त्याला पुण्यात रहायला आवडायला लागल्यामुळे त्याने बाभूळवाडीला येणं बंद केलं होतं, कोणी कोणीतर म्हणायचं कि शाम्याने तिकडेच लव मॅरेच केलं असल्यामुळे तो ईकडे येत नाही आणि ते खरंही ठरलं.


        नंतर नंतर शाम्या आपल्या आईला कावेरीलाही फोन करायचं विसरू लागला, तसा कावेरीचाही ईकडे धीर सुटू लागला, तीची तब्येत खालावत चालली होती, तिला वाटायचं कि शाम्याने मला तिकडे नाही नेलं तरी चालेल पण एकदा येऊन मला भेटावं, माझ्याशी भांडावं, मला माझ्या लेकरानं तोंड दाखवावं.


      आज कावेरीची तब्येत एकदम खालावली, तिला शाम्याची खुप आठवण येत होती. सारखं बडबडत होती,
"शामा तू कुटं गेला??, मही तुलं किव येईनं का?? मव्हा काय गुना झाला कि तु मलं सोडून गेला, मी किती दिवस तुही वाट पाहू, एकदातरी येणं मायं, मी कोणासाटी जगू " 

     
      असं ती विव्हळत होती, तीच्या त्या आवाजाने सगळा गाव जमला, कोणाला काही सुचेना, तिच्या अशा विव्हळण्यानं बायका डोळ्याला पदर लावायला लागल्या, कोणाच्या डोळ्यातून अश्रू तर कोणी मुसूमुसू रडू लागलं, काही लोकं शामानं यायला पाहिजे होतं असे म्हणू लागले, ब-याच लोकानी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण 'आपण डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही ' असं उत्तर यायचं पुढून पण कावेरीला सांगण्याची कोणाची हिम्मत होईना, सगळेजण येईल शामा म्हणून तिला धिर देण्याचा प्रयत्न करत होते.


        सकाळपासून कावेरीने आन्नपाणी घेतलं नाही, आज गावातलं कोणीच शेतात गेलं नाही, कावेरी सकाळपासून विव्हळत पडलीय, कोणाला दवाखान्यातही नेऊदेत नव्हती, मह्या शाम्याला बोलवा मी बरी होईन असं बडबडत होती, सकाळपासून व्याकूळ होऊन गेली, हळूहळू तिचा आवाज कमी होत जात होता, वर पञांकडे नजर खिळली ती खिळलीच, परत तिने पापण्यापण हलवल्या नाही आणि कावेरी गेली.

और नया पुराने