पुन्हा आलीस.
भारतची ईकडे तिकडे पळापळ चालली होती, भारतच्या भाचीचं लग्न होतं आणि त्या लग्नाची पूर्ण जबाबदारी भारतवरच आहे अस त्याच्या धावपळीवरून वाटत होतं पण भारतला सवयच होती प्रत्येक काम घाई घाईने करायची त्यामुळे सकाळपासून पळत होता, लग्न उद्याच होतं आणि आज नवरदेव हळदीला येणार होता.
ईकडे तिकडे पळून भारत दमला असावा, आणि दुपारही झाली होती म्हणून घरी आला, जेवण केलं आणि आराम करायला म्हणून थोडा बसला तोच त्याला समजलं कि नवरदेव आला, म्हणून आपला तो उठला आणि लग्नघरी गेला, नवरदेवासोबत सकवण्या म्हणून भारतचे भाऊजी धनंजय आले होते, एकमेकांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या,
तेवढ्यात नवरदेवासोबत ज्या करवल्या आल्या होत्या त्यांमध्ये भारतला एक ओळखीचा चेहरा दिसला आणि त्याच्या काळजाचे ठोके वाढायला लागले. थोडा विचार केल्यानंतर आठवलं कि तो चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून ती म्हणजे भाऊजीची मावस बहिण आरोही होती. तुला बघून भारतला एक सुखद धक्का बसला. हिच ती आरोही होती जी त्याला तिन वर्षापूर्वी ताईच्या घरी भेटली होती आणि बघता क्षणी त्याला आवडली होती. तिला बघून त्याला तो दिवाळीचा सन आठवला.
तिन वर्षापूर्वी भारत आपल्या बहिणीला दिवाळीला घेऊन येण्यासाठी तिच्या गावी गेला होता, तेंव्हा तो बारावीला होता, बहिणीचं गाव त्याच्या गावापासून बरच दुर होतंं. भारत बहिणीच्या गावी उतरला तेवढ्यात दुसऱ्या बसमधून बहिणीचे सासरे उतरले, त्यांच्या पाठोपाठ एक मुलगी उतरली. दोघांनी एकमेकांना राम राम केला आणि घराकडे चालायला लागले, तशी ती मुलगीही त्यांच्या सोबत यायला लागली.
त्या मुलीला पाहिल्या पाहिल्या भारतला आवडली होती. तसं भारतचं ते वयही होतं म्हणा पण लग्नासाठी हिच मुलगी माझ्यासाठी बरोबर आहे असं त्याला तेंव्हाच वाटायला लागलं. तसंतर लग्नाचा विषयच भारतच्या डोक्यात फार लवकर आला असंच म्हणाव लागेल.
बोलत बोलत घरापर्यंत पोचले, तशी ती मुलगी घरात घुसली, भारत आपला हातपाय धुऊन बाहेर बाजेवर बसला, तसे बहिणीचे सासरे त्याच्यासोबत येऊन बसले. भारतला त्या मुलीला पहावं वाटत होतं पण ती काय तोंड दाखवायला तयार नव्हती.
चहा, नाष्टा झाला आणि भारत ताईला घेऊन परत निघाला, पण सगळ्या प्रवासात त्याला तिच आठवत होती, न रहावून भारतने ताईला विचारलच.
"ताई ती मुलगी कोण आहे?"
"आरोहीबाई व्हय, ती मही मावस नणंद हाय, दिवाळीला आणली मामांनी."
भारतला प्रथमच कळलं होतं हि तिचं नाव आरोही आहे म्हणून, त्याला ती जेवढी आवडली होती तेवढच तिचं नाव त्याला आवडलं होतं, त्याला एकतर्फी प्रेम झालं असावं असच वाटत होतं. सगळ्या प्रवासात तो तिलाच आठवत होता. संध्याकाळी घरी पोचले, जेवण झाली, सगळे झोपले पण ह्या गड्याला झोप येत नव्हती, तो विचार करत करत पार स्वतःच्या लग्नापर्यंत पोचला होता.
दिवाळी संपली, ताईला घ्यायला तिचे सासरे आले, पण ते येतांना आरोहीला तिच्या घरी सोडून आले होते हे कदाचित भारतला माहित नसावं, म्हणून ताई जातांना भारतने आपल्या ताईकडे एक ग्रिटींगकार्ड दिले आणि ते आरोहीला द्यायला सांगितले, परंतु ताई तिच्या घरी जाण्या अगोदरच आरोही तिच्या घरी गेली होती त्यामुळे ते कार्ड तिच्यापर्यंत पोचलच नव्हतं आणि ते भारतला जवळपास पाच ते सहा वर्षांनंतर कळालं होतं, आणि त्याला आतापर्यंत वाटायचं कि माझं कार्ड तिला तेंव्हाच भेटलं आणि माझ्या भावना तिच्यापर्यंत तेंव्हाच पोचल्या.
तेवढ्यात भाऊजीनी भारतच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो दचकला, भारत मस्त आपल्या आठवणी आठवत होता. आज आरोहीला ईथे बघून फार खुशी झाली होती, आपलं अधूरं काम पूर्ण करू असं त्याला वाटू लागलं. तिन वर्षानंतर तो तिला बघत होता, तिच्यात बराच फरक जाणवत होता, फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे तिचं लाजणं.
तिने तेंव्हाही भारतकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं आणि आजही भारत तिच्या अवतीभोवती फिरत होता पण ती आजही त्याच्याकडे बघत नव्हती, यरवी पोरं जसे कोणत्याही मुलीकडे बघतात तसा हाही बघत असावा असं तिला वाटत असावं आणि हिला आपण तिन वर्षापूर्वीच कार्ड देऊन ओळख करून घेतली त्यामुळे तिने ओळख द्यावी असं भारतला वाटत होतं.
सगळा लग्नसमारंभ पार पडेपर्यंत भारत तिच्या मागेपुढेच होता पण तिने एकही नजर दिली नव्हती, पण तिन वर्षापूर्वी पाहिलेली आरोही परत आपल्याला भेटली आणि ती आपलीच होईल ह्या स्वप्नातच तो रंगला होता. त्याला ती परत दिसली ह्यातच तो खुश होता. आपली हरवलेली अनमोल वस्तू परत सापडावी तसा त्याला आनंद झाला होता.
लग्नाच्या काही दिवसानंतर भारत आपल्या काॅलेजला निघून गेला पण त्याच्या मनात लपून राहिलेलं प्रेम पुन्हा उफाळून आलं होतं. त्याला ह्या अगोदर कोणती मुलगी भेटली नाही असं काही नव्हतं पण आरोहीत काहीतरी जादू नक्कीच होती कि ती पहिल्याच नजरेत त्याला आवडली होती आणि आज त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी होती तरीही त्याला तिच पुन्हा आवडायला लागली होती. तो पुन्हा आरोहीचा विचार करायला लागला होता, लग्नाचे स्वप्न बघायला लागला होता.
सध्या त्याच्या आयुष्यात जी मुलगी होती ती दुस-या जातीची होती, त्यामुळे त्यांचं लग्न होणं कधीही शक्य नव्हतं, आणि ही गोष्ट त्या दोघानाही माहीत होती, कधीतरी आपली ताटातूट होईल हाही विषय त्या दोघांमध्ये झाला होता, त्यामुळे ते दोघं फक्त वर्तमानात एकमेकांवर प्रेम करायचे.
त्या लग्नात आरोहीला बघितल्यावर तर भारतच्या डोक्यात फक्त आरोही आरोहीच येत होती.
नागपंचमी आली होती, त्यामुळे भारत सनाला आपल्या गावी जाणार होता, येतांना सानिका, त्याची भाची जिचं मागे लग्न झालं होतं तिचं गावही वाटेवरच होतं त्यामुळे तिलाही घेऊन ये असं सांगितलं, तो आपल्या भाचिच्या घरी ह्या आगोदर कधीच गेला नव्हता, तिला आणन्याच्या निमित्ताने जाणं झालं आणि परत एक सुखद धक्का बसला, तो म्हणजे आरोही तिथेच होती.
आरोहीला भारतने पहाण्याची ही तिसरी वेळ, तिला आपल्या भाचीच्या घरी बघून भारतचा आनंद गगनात मावेना, बरं झालो आपण भाचीला आणायला आलो असं त्याला वाटलं.
खरं म्हणजे भारतचे भाऊजी धनंजय आणि त्याच्या भाचिचे मिस्टर हे दोघ मावसभाऊ होते, त्यामुळे भारतच्या ताईची जशी ती मावस नणंद तशी भाचीचीपण मावस नणंद. चहापाणी घेऊन भारत निघाला. प्रवासात भारतने आपल्या भाचीला विचारलं.
" ही आरोही ईकडे काय करतीय?"
"बाई व्हय?, त्या आमच्याकडेच हाईत शिकायला."
" काय शिकत आहे सध्या?"
"त्या ईथच हाईत, या पाॅलिटेक्निकला."
यवढ ऐकून भारत गप्प बसला, तिच्याविषयी जास्त विचारल्यास भाचीला शक येईल असं वाटलं असावं.
भारतला तिला पाहून खुप आनंद झाला पण तिने एका नजरेनेही भारतकडे पाहिलं नाही, ती कधीच समोरच्या मानसाकडे बघत नसे, फार लाजाळू होती. भारत आलेला पाहिला कि भांडे घासता घासता उठून ती दुसऱ्या खोलीत गेली होती. तिची ही सवयच भारतला फार आवडत होती.
आता भारतचं भाचीच्या निमित्ताने तिच्या घरी येणंजाणं व्हायला लागलं, तशी भारतच्या मनात ईच्छा प्रबळ व्हायला लागली, आता आपण हिला विचारायलाच हवं अस वाटू लागलं. पण तिला विचारावंतरी कसं हाच मोठा प्रश्न होता. ना ती आपल्याकडे बघते, ना बोलते, ना जवळ बसते.
एकदा असच दिवाळी होऊन गेली होती, भारत त्याच्या भाचीला घेऊन तिच्या घरी आला, आरोही ही होतीच तिच्या घरी. आरोही बाजूच्या खोलीत होती आणि ईकडे भारत आणि सानिकाचे सासरे जेवण करत होते, भारतचं मन आज जेवणात नव्हतं, काहीही करुन आरोहीला विचारायलाच हवं हेच मनात होतं. म्हणून आपला पटापट जेवला आणि हात धुऊन उठला, त्याला आरोही बसली त्या खोलीत जायचं होतं आणि तिच्याशी बोलायचं होतं, तसा तो त्या खोलीकडे गेला.
भारतला आपल्या खोलीकडे येतांना बघून आरोही पटकन ऊठली आणि खोलीच्या बाहेर, आपल्या मावशीकडे निघून गेली, भारतचा प्लॅन बिघडला, त्या खोलीत गेला आणि विचार करायला लागला कि हिला आपल्या मनातलं सांगायचं कसं?.
तेवढ्यात त्याला जवळच आरोहीचा मोबाईल पडलेला दिसला, त्याने लगेच तिच्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलवर काॅल केला व तिचा नंबर सेव्ह करून घेतला. त्याला एक मार्ग सापडला पण हा मार्ग खुप अवघडही होता. त्या खोलीत बसल्या बसल्या एका पेपरच्या पुरवणीवर पेन ने गिरवून छान दिवाळीच्या शुभेच्छा लिहून ठेवल्या, तेही मोठ्या अक्षरात आणि तिला सहज दिसेल असं ठेऊन दिलं.
थोड्या वेळाने तो निघाला, बसमध्ये बसला, पण त्याला रहावत नव्हतं, त्याच्याकडे आता तिचा मोबाईल नंबर आला होता त्यामुळे कधी कधी तिला विचारू असं झालं होतं. हातात मोबाईल घेऊन सारखा त्या नंबरकडे बघत होता, तिला काॅल करू कि नको, करू कि नको असं वाटत होतं. तिला जर आपलं काॅल करण आवाडलं नाही तर ती तिच्या मावशीला सांगेन आणि त्यामुळे आपली बदनामी होईल असं मनात वाटत होतं. पण आता विचारलं नाही तर नंतर कधीच हिम्मत होणार नाही असं त्याला वाटू लागलं.
शेवटी हिम्मत करून भारतने तिला मॅसेज पाठवला कि '
'मला तुझ्याशी बोलायचं आहे'
- भारत.
मेसेज भघून तिने लगेच काॅल केला, ती रागा रागानेच बोलत होती.
" तुम्ही माझा नंबर कुठून घेतला?
ती रागानेच बोलत होती पण भारतनेही मनावर ताबा ठेऊन न घाबरता उत्तर दिलं.
" तुझ्या मोबाईल मधून."
"का घेतला, मला असं आवडत नाही, तुम्ही तो डीलिट करा आताच्या आता."
हे ऐकून भारतला वाईट वाटलं, एवढया दिवस जिच्या मागे आपण आहोत तिला आपण आवडतही नाहीत आणि आपल्याशी तिला बोलण्यात रस ही नाही.
"ठिक आहे करतो डीलिट, पण मला बऱ्याच दिवसापासून तुझ्याशी बोलायचं आहे तेतरी ऐकून घे."
एवढ ऐकून ति थोडी शांत झाली.
"बोला काय बोलायचं ते"
भारत सर्व शक्ति पणाला लाऊन बोलला.
"मला तू आवडतेस."
हे ऐकून ती चिडली नाही पण तिने सरळ सांगितलं.
"मला हे असलं काही आवडत नाही"
भारतने परत एक शब्द टाकला.
"मला तू बऱ्याच दिवसापासून आवडतेस, आणि मला लग्न करायचं आहे तुझ्याशी"
लग्नाचा विषय काढल्यामुळे तिला थोडासा विश्वास आला कि हा टाईमपास करत नाहीये, म्हणून आता ती शांतपणे बोलायला लागली.
"माझ्या लग्नाचं माझ्या मनावर नाही, माझ्या घरचे म्हणतील तेच होईल".
हा तिचा प्रामाणिकपणा होता, खेड्यातल्या मुली कितीही शिकल्या तरी लग्नाचा अधिकार घरच्यानांच असतो. भारतही तिला प्रामाणिकपणे बोलत राहिला.
"हो माहित आहे, पण आपण नात्यात आहोत त्यामुळे आपलं लग्न होईल याची मला खाञी आहे. फक्त मी तुला आवडतो का ते सांग, नसेल आवडत तर आजपासून काॅल करणार नाही."
आतामाञ आरोहीला खाञी झाली. आरोहीनेही प्रामाणिकपणे मान्य केले.
"मलाही आवडता तुम्ही, करतजा काॅल."
असं बोलता बोलता बोलत राहिले दोघेही. भारत आपल्या रूमवर पोचला. भारत खुश होता कि चार वर्ष बघत आलेली मुलगी आज त्याच्याशी बोलत होती, नुसती बोलत नव्हती तर तिने त्याचं प्रेमही मान्य केलं.
अाता रोजच फोन यायला लागला, एकमेकांशी छान गप्पा रंगायच्या, भारत आपण किती दिवसापासून तुझ्या मागे आहे ते सांगायचा आणि आरोहीला ते आवडत नसायचं असं आरोही सांगायची, आणि दोघेही खदाखदा हसायचे.
भारतच्या ह्या प्रेम कहाणीत भारतचं डी. एड कधी संपलं कळलं नाही, शिक्षण संपलं, पण अजून नोकरी नव्हती, म्हणून भेटेल तिथे पार्ट टाईम नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण अशी आपल्याला नोकरी लागणार नाही म्हणून त्याने पूर्ण वेळ अभ्यासाला द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने आपल्या भावाकडे, नाशिकला जाण्याचं ठरवलं.
सध्या भारत आरोहीच्या जवळ होता, म्हणून आधून मधून भेटणं व्हायचं, आता तो नाशिकला जाणार त्यामुळे आपली भेट होणार नाही म्हणून आरोही त्याला नाशिक ला जायला नको म्हणत होती, परंतु कसंबसं तिला समजावून भारत नाशिकला गेला, आणि अभ्यासिका लावून रोज १२-१३ तास अभ्यास करायला लागला.
भारतचा अभ्यास छान चालला होता पण मध्येच एक संकट आलं, आरोहीच्या घरचे तिच्या लग्नाच्या मागे लागले, या वर्षी तिचं लग्न करु अशा तिच्या घरी चर्चा चालायच्या त्यामुळे आरोही टेंशनमध्ये आली, तीने भारतला सांगितलं. माझ्या घरच्यांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेव असा तगादा लावला.
भारतलाही फार टेंशन आलं, त्यालाही काही कळत नव्हतं, त्याने एकदिवस आरोहीच्या भाऊजींना ही गोष्ट सांगितली कि माझं आरोहीवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. हे ऐकून तिच्या भाऊजींनी भारतला भेटायला बोलावलं, तो त्यांना भेटून आला, त्यांनाही तो आवडला, पण काही दिवसांनी परत दुसरं संकट आलं.
आरोहीच्या घरच्यांना आता भारत आणि आरोहीचं सगळं प्रकरण समजलं होतं, त्यामुळे त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला, तिला आपल्या घरी घेऊन गेले.
तिचे आई वडील लग्नाला तयार होत नव्हते, भारतने त्यांना फार समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं म्हणनं होतं कि ना तुझ्याकडे नोकरी आहे, ना रहायला घर आहे, ना जास्त शेती, मग आम्ही तुला का द्यायची?
भारतने फार गयावया केली, मी अभ्यास करत आहे, स्पर्धा परीक्षा देत आहे, लागेल एखादी नोकरी, मी तिला सुखात ठेवीन असे एक ना अनेक वचन दिले पण त्यांना काही फरक पडला नाही. शेवटी त्यांनी आपली मुलगी द्यायला तयार होईनात.
भारत त्यादिवशी फार नाराज झाला, त्याला खुप दुख झालं. त्याला काय करावं काही सुचेना, परत शेवटची आशा म्हणून त्याने आरोहीच्या भाऊजीना काॅल केला त्यांना विनंती केली. त्यांनी सासू सासऱ्यांना समजावून संध्याकाळी सांगतो असं सांगितलं.
भारतच मन आज अभ्यासात लागत नव्हतं, तो आज लवकरच घरी आला, आणि आपली पुस्तकाची बॅग ठेऊन बाहेर गेला, आणि फोनची वाट बघत राहिला. संध्याकाळी त्यांचा काॅल आला, त्यांनी सांगितलं कि सासरे तयार झालेत पण एक अट आहे.
तयार झालेत हे ऐकून भारत खुश झाला, त्याला थोडं हायसं वाटलं, आणि बोलला.
"काय अट आहे?'
त्यांनी सांगितलं.
"ते म्हणतायत कि लग्न एका महिन्यात करावं लागेल."
हे ऐकून भारत संभ्रमात पडला. तिचे आई वडील तयार झालेत हि खुशीची गोष्ट होती तर एका महिण्यात लग्न कराव लागेल ही कठीण.
भारतने घाई घाईत 'हो' म्हटलं.
आता ह्यांना तर भारतने हो म्हटलं, पण त्याच्या भावांना ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, भारतच त्याच्या भावाच्या जिवावर जगत होता तर मग लग्न करुन आरोहीला कुठे ठेवणार होता?, तरीपण त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून दुसऱ्या दिवशी भावाला सगळं सांगू म्हणून झोपला.
दुस-या दिवशी भारतने आपल्या भावाला अभ्यासिकेकडे बोलावून घेतलं, आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून भावाला आश्चर्याचा धक्का बसला कि एवढं सगळं झालं आणि हा आज मला सांगतोय. आणि तेही खरच होतं.
भारत नाशिकवरून पुण्याला जावून आरोहीच्या भाऊजींना भेटून आला होता, एवढं प्रेम प्रकरण केलं होतं, एवढच नाही तर स्वतःच्या लग्नाची सगळी बोलणी झाल्यानंतर तो भावाला सांगत होता त्यामुळे त्याला धक्का बसणारच होता.
एवढं सगळं झालं ह्याचं भारतच्या भावाला काही वाटत नव्हतं पण त्याचं म्हणनं होतं कि आताच जर लग्न केलं तर तुझा अभ्यास कसा होईल? तू बायकोला कुठे ठेवणार? काय खाऊ घालणार? वगेरे वगेरे.
हे ऐकून भारतला काही सुचेना, त्याचं डोकं काम करणं बंद झालं, कोणाचं ऐकावं काही कळेना.
शेवटी भारतने आरोहीच्या आई वडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कि आपण या वर्षी साखरपुडा करु आणि पुढच्या वर्षी लग्न करू, पण तिच्या घरचे काही ऐकायला तयार होईनात, करायचं असेल तर एका महिण्यात लग्न करावं लागेल हाच एक मुद्दा घेऊन बसले. आणि इकडे भारतचा भाऊ त्याला समजवत राहिला. शेवटी भारतला काहीच करता आलं नाही, आरोहीच्या घरच्यांनी नकार दिला.
त्या दिवशी भारत बाहेर जाऊन खुप रडला, त्यानंतर भारत सारखा तिन दिवस जेवला नाही, अभ्यासिकेत जायचा पण नेलेला डब्बा टाकून देऊन घरी यायचा. त्याच्या मनावर प्रचंड आघात झाला.
आरोहीच्या घरच्यांनी तिला पटवून सांगितलं कि भारतनेच नकार दिला त्यामुळे तिला गैरसमज झाला आणि ४-५ दिवसांनी तिचा एकच मेसेज आला.
"आय हेट यू"
भारतने त्यादिवशी निश्चिय केला कि एकना एक दिवस मी नोकरी मिळवून दाखविण आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला लागला.
शेवटी तिचं लग्न ठरलं आणि त्याचवेळी भारतला नोकरी लागली, पण वेळ निघून गेली होती, आरोहीला भारतवर विश्वास होता पण वेळ निघून गेली होती, तिचं लग्न ठरलं होतं पण तरीही ती भारतवर तेवढच प्रेम करत होती, भारत आणि आरोहीचं परत बोलणं सुरू झालं होतं.
आरोही लग्नाला बिलकुल तयार नव्हती, पण घरच्यांना विरोधही करू शकत नव्हती. लग्न चार दिवसावर आलं होतं, तरी घरी जात नव्हती, शेवटी भारतने स्वतः लग्नाच्या चार दिवस अगोदर तिला आपल्या गावी नेऊन सोडलं आणि जड पावलांनी परत आला. परत येतांना आरोहीने एक गुलाब दिला होता ज्यांच्या पाकळ्यांमध्ये 'भारत-आरोही' असं लिहिलेलं होतं, भारतने ते बरेच वर्ष जपून ठेवलं होतं.
भारतला दुःख होतं कि आपल्याला आपलं प्रेम मिळालं नाही, परंतु नोकरी मिळवली याचा अभिमानही होता.
लेखक- सागर दुभळकर.
Tags:
Stories/Poems