हरकत नाही....
चांदण्यात ह्या आलीस इथवर हरकत नाही
चंद्र गवसला पुनवेनंतर हरकत नाही
बोललीस तू नुसते वरवर हरकत नाही
म्हणालीस तू भेटू नंतर हरकत नाही
हरकत नाही माझी आता कसली बाकी
डबकी म्हणतील आम्हीच सागर हरकत नाही
तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो
शोधायाला पुन्हा नवे घर हरकत नाही
रडता रडता मी अश्रुंचा फाया केला
तुला अता हे म्हणेल अत्तर हरकत नाही
तुझे नि माझे नाते कुठले सांग एकदा
तुझ्याकडे जर नसेल उत्तर हरकत नाही
मनात सगळे हवे हवेसे ओठी हरकत
अशी असू दे हरकत सुंदर हरकत नाही
भरतीहुनही तुझी ओहोटी भरात येते
जगावेगळा तुझा समिंदर.. हरकत नाही
घड्याळात पाहिले तिने अन् समजून गेलो
निघावयाला नानिवडेकर हरकत नाही
-मधुसूदन नानिवडेकर
9404440276
Tags:
Stories/Poems